राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जोड रस्त्यांची झाली चाळण

Foto
एसटी बसेस गावात येणे बंद झाल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांचे हाल

खुलताबाद, (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाच्या कमालीच्या उदासीनतेमुळे गल्ले बोरगावला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ शी जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे एसटी चालकांनी गावातून ये जा करणे टाळले असून, बसेस थेट बायपासवरून पळवल्या जात आहेत. याचा थेट फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक बाजारपेठेला बसत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

जोड रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष: बाजारपेठ संकटात राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील गल्ले बोरगाव बायपासचे काम पूर्ण झाले, त्यावेळी गावाला जोडणाऱ्या देवगाव फाटा देवगाव फाट्यावरील रखडलेला उड्डाणपूल, अंधारामुळे अपघातांचे सत्र सुरुच आणि टाकळी फाटा या दोन्ही प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे अत्यावश्यक होते.

मात्र, प्राधिकरणाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली. परिणामी, एकेकाळी गजबजलेली गल्ले बोरगावची मुख्य
बाजारपेठ आज पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने स्थानिक व्यापार ठप्प झाला आहे.

विद्यार्थी आणि प्रवाशांची फरफट रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांमुळे बाजारपेठ ठप्प झाल्याने महामार्ग एसटी महामंडळाच्या बसेस गावातील बसस्थानकावर न येता सरळ बाह्यवळण (बायपास) रस्त्याने निघून जातात. यामुळे शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना भर उन्हात किंवा रात्रीच्या वेळी बायपासपर्यंत पायी पायपीट करावी लागत आहे. 

आजारी व्यक्ती, महिला व वयोवृद्ध प्रवाशांना महामार्गावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे उकळत आहेत. पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी हा भाग अंधारात बुडालेला असतो. सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडून निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येत आहे.

देवगाव फाटा येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून ठप्प पडले आहे. या अर्धवट कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्सचा पूर्णपणे अभाव आहे.

-- आंदोलनाचा इशारा --
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ देवगाव फाटा व टाकळी फाटा या जोड रस्त्यांची दुरुस्ती करून रुंदीकरण करावे, देवगाव फाट्यावरील उड्डाणपुलाचे काम विनाविलंब सुरू करून आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी गल्ले बोरगाव ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.